Loading...
Loading...
Loading...
OPD Time: Monday to Saturday : 12.00 pm to 3.00 pm & 7:30 pm to 9:00 pm

zplusaccidenthospital@gmail.com

88055 78176

Dr. Rahul's Blog

Home Dr. Rahul's Blog
Dr. Rahul's Blog-1 [ मिशन कझाकिस्तान ...स्मिताची तिसरी यशस्वी आयर्नमॅन स्पर्धा ]

मिशन कझाकिस्तान ...स्मिताची तिसरी यशस्वी आयर्नमॅन स्पर्धा अन माझी "क्रू "गिरी .. अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत परत नवीन देशात फुल्ल आयर्न मेन करणे हे जरा स्मिता साठी अवघडच होते.स्मिताने मागच्या वर्षी दुबई अन या वर्षी साऊथ आफ्रिकेची आयर्नमॅन यशस्वी रित्या पूर्ण केली . ( हॅम्बर्ग जर्मनीची ऍक्सीडेन्ट मूळ सोडावी लागलेली आयर्नमॅन वेगळी ) तर तिची हि तिसरी आयर्नमॅन तिने पूर्ण केली .खरं तर एक, दोनस्पर्धा झाल्यावर अन आयर्नमॅन हा 'किताब मिळाल्यावर बरेच लोक थांबतात .पण आम्ही दोघांनी प्रत्येकी 10/10 आयर्नमॅन करायचं ठरवलं आहे .ज्या ज्या खंडात ह्या स्पर्धा होतात त्या खंडात प्रत्येकी 2 वेळा जाऊन आम्हाला तो भागही पाहून घ्यायचाय . ( नाहीतर आम्हा उभयतांना घराच्या लोकांनी लेकरं त्यांच्यावर सोपवून जगभ्रमंतीला सोडलं नसत 🙈) प्रत्येक देशातील वातावरण , सायकलिंग रूट , स्विम आणि रनिंग रूट अन त्यांचे चढउतार अगदी वेगवेगळा असतो .त्यामुळं प्रत्येक स्पर्धा पूर्णतः वेगळी असते . तसेच वेगवेगळ्या खंडातील माणसं , बोलीभाषा , रीतिरिवाज , खानपान , संस्कृती , जीववैविध्य अगदी वैशिष्ट्यपूर्ण अन निराळं असत या सगळ्या आयर्नमॅन निम्मिताने ते जवळून पाहता आलं .कझाखस्तान चा हा स्विम शांत नदीतील होता , सायकलिंग एकदम सपाटीवर होत ( थोडं जास्तीच वार आणि ऊन नक्कीच होत ) रनिंग सपाटीवरच होत . एकंदरीत फास्ट आयर्नमॅन रेस होती. त्यामुळं स्मिताच तिन्ही विभागात ( स्विम / सायकल / रन ) पर्सनल बेस्ट परफॉर्मन्स झाला .नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी शेवटचे 10 किलोमीटर तिच्याबरोबर पळालो .

मी यावर्षी आमच्या पॉवरपिक्स टीमबरोबर "सपोर्ट क्रू " म्हणून गेलो होतो .कझाक आयर्नमॅन स्पर्धेतील सर्वाधिक मोठ्या संख्येची दुसऱ्या क्रमांकाची आमची पॉवरपिक्स ची टीम होती ( आणि त्याबद्दल ऑल वल्ड ऍथलिट संघटनेकडून आम्हाला पोडियम वर मानाची सिल्वर कॅप सुद्धा मिळाली ) तर एकूण 37 आयर्नमॅन स्पर्धकांना क्रू करण्याची जबाबदारी आमचे कोच चैतन्य वेल्हाळ यांनी मला आणि ओंकार ला दिली होती .तर काय असत क्रू च काम . स्पर्धेच्या पूर्ण काळात कझाकच्या भूमीवर आपल्या टीमच्या लोकांना काय हवं नको ते पाहणं म्हणजे क्रू च काम . मुख्य काम सुरु झालं स्पर्धेच्या दिवशी .सगळ्या स्पर्धकांनी दिलेल्या मेडिसिन / त्यांच्या वैयक्तिक खाण्यापिण्याच्या गोष्टी / प्रत्येकाचे भारताचे झेंडे /हवेचे पम्प / पॉवरबँक असा 40 एक किलोचा जवाजमा पाठीवर लादून आम्ही पहाटे 5 लाच हॉटेल सोडून इशीम नदीच्या किनारी बसलो .जवळपास सगळ्यांनी येऊन कानात सांगितलं होत कि आमचा विडिओ / फोटो काढ . त्या प्रमाणे शक्य होतील तेवढ्यांचे स्विम च्या एन्ट्री चे / पाण्यातून बाहेर येतानाचे / सायकलिंग स्टार्ट आणि एंडिंग चे असे साधारण 150 तरी विडिओ मी काढले . कारण एवढ्याच त्यांच्या आठवणी आयुष्यभर राहतात . जशी जशी रेस संपत आली तस तस स्पर्धकांना मोटिव्हेशन ची गरज असते .

त्या परक्या भूमीवर कोणीतरी '' चल रे पळ ... तू छान पळत आहेस .... आता थोडासाच राहिलंय ... काही आणून देऊ का ? " असं म्हणणार भेटल तर रनर चा हुरूप लाखपटीनं वाढतो . त्यामुळं मी प्लॅनप्रमाणे एक सोनीची पोर्टेबल साउंड सिस्टिम नेली होती . तिच्यावर मोठ्या आवाजात मोटिवेश्नल गाणी वाजवत आमच्या स्पर्धकांबरोबर पळायला सुरुवात केली . 180 किलोमीटर सायकलिंग केल्यावर जीव तोडून पळायची इच्छा नसते पण ठराविक अंतरावर झेड प्लस साउंड सिस्टिम घेऊन आपल्याबरोबर एक किलोमीटर गप्पा मारत पळणार आहे हे लक्ष्यात आल्यावर त्यांनीही चांगली साथ दिली .अशाप्रकारे दिवसाखेर माझे 45 किलोमीटर पळून झाले पण सगळयांचे मेडल्स पाहून ती तंगडतोड सार्थकी लागली .

या वर्षीची आयर्नमॅन लक्ष्यात राहिली ती लांबलेल्या प्रवासामुळे .विमान कंपन्यांच्या नफेखोर वृत्तीमुळं बऱ्याच स्पर्धकांना त्यांच्या सायकल च्या किमतीपेक्षा जास्त रक्कम सायकल चा बॉक्स वाहून नेण्यासाठी लागली . आमचा फक्त परतीचा प्रवास सांगतो . 35 मोठ्या बॅग सह आम्ही 11 जण कझाकमधील नूर सुलतान एअरपोर्ट वरून रात्री 11 ला निघालो .अबूधाबीला मध्यरात्री 2 वाजता विमानतळावर त्या बॅग उतरवल्या . तिथं बस मध्ये चढवून 2 तासांनी दुबई ला एअरपोर्ट जवळ उतरलो तिथं पहाटे विमानात बॅग चढवून दुबई ते दिल्ली विमानाने आलो .

एवढ्या सगळ्या बॅग परत दिल्लीत उतरवून कस्टम क्लिअर करून पुण्याच्या विमानात चढवल्या . त्या पुणे विमानतळावर उतरवून प्रत्येकाच्या ताब्यात दिल्यावर माझी "क्रुगिरी " संपली . पण या सगळ्या प्रवासात खूप काही शिकलो .खूप ताकदीच्या आंतरराष्ट्रीय ऍथलेट्स ना पळताना बघितलं त्यांना मदत केली . अन मी अन स्मिता स्वतः ला अजून प्रेरित करून आलो पुढच्या आयर्नमॅन साठी .....
जय हिंद
जय भारत!!

Dr. Rahul's Blog-2 [कझाकिस्तानच्या भूमीवर स्वातंत्र्यदिन साजरा करताना... ]

आज पहिल्यांदाच असं झालं कि स्वातंत्र्यदिन होता अन माझं ध्वजारोहण चुकणार होत .अन तेही कझाकिस्तानच्या परकीय भूमीवर असताना.
अन ते हि थोडं थोडकं नाही तर पंच्यात्तराव अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच ध्वजारोहण .पण कदाचित नियतीलाच ते मान्य नसावं ....
आम्ही आयर्नमॅन निम्मिताने कझाकिस्तान ला आलो होतो .

अन चक्क कझाकिस्तानच्या भारतीय दूतावासाने ऑफिशिअल निमंत्रण पाठवून आम्हा सर्व भारतीय आयर्नमॅन स्पर्धकांना ध्वजवंदनासाठी बोलावून घेतले .काळ्या लांबसडक मर्सिडिज बेंझ मधून आलेल्या कझाकिस्तानसाठीच्या भारतीय राजदूत शुभदर्शिनी त्रिपाठी मॅडम च्या हस्ते 9 वाजता भारतीय ध्वज फडकला .अन त्यानंतर झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात कझाकी नागरिकांनी जी भारतीय गाणी , भारतीय राज्यनिहाय पारंपरिक नृत्य सादर केली त्याचे मी काही विडिओ सोबत जोडत आहे . ज्या कझाकी लोकांचा रंग , रूप , बोलीभाषा , देहबोली , परंपरा आपल्या भारतीयांसारख्या नाहीत तरीही त्या गाण्यामध्ये त्यांनी किती जीव ओतलाय पहा .

कुठंच त्या नर्तिका कमी पडल्यात असं वाटत नाही ." विविधतेतून एकतेकडे " हि जी भारतीयत्वाची भावना आमच्या हृदयापर्यंत पोचवायची होती ती पोचवली .राजदूत मॅडम नि महामहिम राष्ट्रपतींचा संदेश आम्हास वाचून दाखवला .जमलेल्या भारतीय क्रीडापटूंनी भारत माता कि जय आणि वंदे मातरम च्या जयघोषानि कझाकी परिसर जिवंत केला .

कझाकी तरुणींनी आपल्या स्वातंत्रदिनादिमित्त परंपरेप्रमाणे छोटी छोटी चॉकलेट्स वाटली अन छोले भटुरे ,सामोसे , तिरंगी शिरा अन मसालानी चाय असा मस्त नास्ताही झाला .
भारतीय राजदूत शुभदर्शिनी त्रिपाठी मॅडम नी आवर्जून मला अन स्मिता ला बोलावून घेतले अन "पहिले डॉक्टर आयर्नमॅन जोडपे "म्हणून कौतुकही केले .
त्यावेळी काढलेला फोटो या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची अविस्मरणीय आठवण म्हणून सदा स्मरणात राहील .
जयहिंद
स्वातंत्रदिन चिरायू होवो

Dr. Rahul's Blog-3 [झेड प्लस गडसंवर्धन]

काल आपला शिवाजी सहा वर्षाचा झाला .
दरवर्षीप्रमाणे केक आणि सेलिब्रेशन न करता आपण लोहगडावर गड स्वच्छता केली .
तसेच हडपसर मधील एका सामाजिक संस्थेस सर्व स्टाफ ने एक दिवसाचा मानधन दिवेघाटावरील वृक्षारोपणास अर्थ साहाय्य म्हणून दिले ( तसेच पुढील महिन्यात तेथे सर्वजण जाऊन एक रविवार श्रमदानही करतील ). गेले 2 वर्ष कोविड मुळे आपल्या झेड प्लस गडसंवर्धन समितीस वाढदिवसानिम्मित गडावर जाता आले न्हवते .
त्यामुळं या वर्षी सर्व स्टाफ ने हिरीरीने सहभाग नोंदवला .

नामकरण : तीर्थ रायगड
प्रथम वाढदिवस : किल्ले पुरंदर अन मल्हारगडावर 2000 सीड बॉल
द्वितीय वाढदिवस : राजगड पायथा ⓩⓟ शाळांमध्ये साहित्यवाटप कार्यक्रम
त्रितीय वाढदिवस : किल्ले सुधागडाच्या पायथ्याच्या वाड्यावस्त्यावर आरोग्य शिबीर अन सौरदिवे वाटप .
चौथे अन पाचवे वर्ष : कोविड काळ
सहावे वर्ष : लोहगड अन दिवेघाट वृक्षारोपण .
आपले विनम्र
झेड प्लस गड संवर्धन समिती 🙏

Dr. Rahul's Blog-4 [कापसे बंधूंची पुरीभाजी]

लहानपणी गावाकडं खायचो तशी तर्रीबाज पुरीभाजी खायची इच्छा झाली होती म्हणून काल लोणंद च्या व्हाट्स अँपग्रुप वर चौकशी केली अन एक अड्डा सुचवला गेला .
आज सकाळी लवकर गाडी काढून लोणंदच्या बाजारात पोचलो सुद्धा .
कापसे बंधूंची पहिल्यांदा तिथं पुरीभाजीची टपरी होती त्याच टपरीला जरासं फुगवून प्लॅस्टिकच्या पोत्याचे पडदे सोडून मस्त बसायला टुमटुमीत रेस्टारंट केले होते .
आतमध्ये चक्क प्लास्टिक चे पडदे सोडून गावाकडच्या बायाबापड्यांसाठी फॅमिली रूम पण होती .
सिटीमध्ये बघितलंय रेस्टारंट जेवढं महागडं तेवढाच पुरीभाजी बकवास मिळते .
अगदी काही उच्चभ्रू हॉटेलमध्ये तर मी पुरीबरोबर पिवळ्या बटाट्याची भाजी पण खाल्लीये (🙈).

तर लोणंद बाजारातल्या कापसेंच्या हाटिलात जाऊन मी पुरी भाजीची ऑर्डर दिली अन हात धुवून लगेच पुऱ्यांचा घाणा जिथं तळतात तिथं जाऊन उभा राहिलो ( कारण पूर्वानुभव असा सांगतो कि हे लोक फक्त वरच्या दोन पुऱ्या गरम देतात अन खालच्या तीन शिळ्या .🤗 आणि मला एवढ्या लांब येऊन चान्स घ्याचा न्हवता )
बटाट्या च्या सारणावर मस्तपैकी तर्री टाकून त्यावर चिरलेला कांदा पेरून अन लिंबू पिळून वाफाळलेल्या पुरीच्या द्रोणात ते घालून मी ब्रम्ह्णानंदी टाळी लावली .
एक पुरी शिल्लक असतानाच आत जाऊन अजून एक प्लेट पुरी तेलात सोडायला लावली .आणि हि प्लेट खारी सारखी कुरकुरीत करायची फर्माइश दिली .
तोपर्यंत आपल्याकडं जिभेला चव असलेला कोणतरी खादाडखाऊ आलाय याची जाणीव गल्ल्यावर झाली होती .

त्यांनी मग आत जाऊन रस्श्यावरच तेल तेल काढून आणून पळीभर माझ्या ताटात ओतलं अन थोडा ताजा कांदा कापून दिला .( गावाकडं हाटिलवाल्यान जर तुमच्या साठी ताजा कांदा कापला म्हणजे त्यो खुश आहे असं समजायचं 😻) मग त्याच्या आग्रहाखातर शेवटची अन तिसरी निरोपाची पुरी प्लेट खाऊन निघालो .
त्याच परिसरात काम असल्याने परत येताना उशीर होऊनही वाठारची दुर्गा खाणावळीची शेवटची व्हेज राईसप्लेट मिळाली .
त्याविषयी मागे सविस्तर लिहिलं होतंच .
थोडक्यात आमच्यावर आज आई अन्नपूर्णा प्रसन्न होती

Dr. Rahul's Blog-5 [प्रीमियर शरपंजरी ]

प्रीमियर शरपंजरी
सहा महिने रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा दिलेला विद्यार्थी जेंव्हा परीक्षा देऊन निकालाची वाट पाहतो ...
आणि परीक्षकांच्या निर्णयाची वाट पाहत आशेने दिवस काढत असतो आमचाही तसेच काहीतरी झाले होते . रात्र तर तळमळण्यात गेली .
आपला पिक्चर बघायला लोक येतील का नाही ?
आम्ही दिलेल्या फॉर्मेट मध्ये तो 500 GB चा चलचित्रपट त्या मोठ्या पडद्यावर दिसेल कि नाही ?
इथपासून लोकांना तो आवडेल का नाही ?
कोणी आवडला नाही तर मध्यातून उठून तर जाणार नाही ना ?
एक ना अनेक प्रश्न ... आणि 6 चा ठोका पडला .
चौधरी सरांनी लॉबीमध्ये आधीच रेड कार्पेट अंथरून ठेवलं होत .
आमचे चेहरे असलेले डिजिटल अन फ्लेक्स चे पोस्टर्स थिएटर मध्ये झळकू लागले होते .
तेवढ्यात 2/3 जुन्या पेशंटनि पोस्टरवर आमचं दाढीवाल सोंग बघून ओळख दाखवली अन काय डॉक्टर आता फिल्म लाइन मध्ये पण का ? अशी विचारणा पण केली .

अहाहा ....अंगावर मूठभर मास चढलं .
मग प्रेक्षक मंडळी जमली .
कोरोना निर्बंधांमुळं फक्त निवडक निमंत्रितांना आमंत्रित केले होते .
त्यात कलाकारांचे कुटुंबीय , भूतपूर्व अध्यक्ष , ec members , संलग्न संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते . ओंकार सरांनी भाषणात चित्रपटाचा प्रवास उलगडून सांगितला . अजय माने अन पेंडसे सरानी त्यांच्या आशयघन कवितांनी वातावरणातले आयाम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले . त्यानंतर राष्ट्रगीत वाजले अन चित्रपट सुरु झाला .
पुढचे 39 मिनिटे थेटरात पिन ड्रॉप सायलेन्स होता . इतका कि माझ्या मागे पुढे बसलेल्या अध्यक्ष अन डायरेक्टर च्या हृदयाचे ठोके आम्हा एकमेकांना जाणवतील . अन पिक्चर संपला त्यानंतर 5 -7 क्षणांचाच सायलेन्स काय तो असेल ( पण हे सेकन्द जीव घेतात , संपता संपतच नाहीत साले ) अन ... टाळ्यांचा कडकडाट झाला .
उपस्थित प्रेक्षकांनी थेटर डोक्यावर घेतले .प्रेक्षकांना चित्रपट आवडल्याची ती पावती होती . Hma चे पदाधिकारी अन लघुपटाची टीम कृतकृत्य जाहली . कारण महाराष्ट्रात किंवा भारतात असा डॉक्टरांनी एकत्र येऊन ज्यात ऍक्टर , डायरेक्टर , संगीतकार सर्वकाही डॉक्टर आहेत असा पहिलाच प्रयत्न असावा .
आज हा ब्लॉग लिहीपर्यंत पहिल्या 2 दिवसात यू ट्यूब वर 10000 लोकांनी चित्रपट पाहिला होता . नवोदितांच्या लघुपटाच्या बाबतीतले हे सुद्धा एक रेकॉर्डच असावे .
सर्व मायबाप प्रेक्षकांचे सर्व कलावंतांतर्फे अन hma production house तर्फे काळजापासून आभार . तुम्ही हा चित्रपट पहिला असेलच . नसेल तर खालील लिंकवर पहा .
काही चुका असतील तर कान धरून सांगा ...
अन जर आवडलाच तर कृपया लिंक व्हाट्स अँप किंवा फेसबुक वरून पुढे पाठवा .
यू ट्यूब लिंक : https://youtu.be/ummzD1meSEg

Dr. Rahul's Blog-6 [ "हॅम्बर्ग आयर्नमॅन रेस रिपोर्ट " ]

जर्मनीत 5 दिवस क्वारंटाइन व्हावं लागेल ह्या भीतीने मी आणि स्मिता सोमवारीच म्हणजे 6 दिवस आधीच हॅम्बर्ग ला पोचलो .
दैवकृपेने 'सक्तीची नजरकैद ' काय झाली नाही त्यामुळे 5 दिवस हॅम्बर्ग / बर्लिन मनसोक्त फिरता आलं ( त्याचा सविस्तर वृत्तांत लवकरच लिहितो ) खरं तर गेल्या 2/3 वर्षात एकूण 3 आयर्नमॅन इव्हेंट रजिस्टर केले पण जागतिक कोरोना परिस्थिती मुळे सगळे इव्हेंट्स कॅन्सल होत गेले . हि जर्मनी ची रेस पण होईल कि नाही याची शंका होतीच .
तर रजिस्ट्रेशन / व्हिसा अप्रूव्हलची धाकधूक /कोविड च्या स्वाबचे सोपस्कार / त्या सायकल चे तुकडे करून बॅगेतुन नेऊन परत जोडणे /रूट चा आढावा घेणे .....असं करत शेवटी तो शर्यतीचा दिवस उजाडला . हॅम्बर्ग शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अल्स्टर नावाच्या तळ्यात 4 किलोमीटर स्विमिंग चा कार्यक्रम होता . मागचे 2 दिवस तळ्यातल्या पाण्याला ऊन न दिसल्याने पाणी फार म्हणजे फारच थंडगार होते .17 डिग्री च्या पाण्यात पहिला सूर मारल्यावर अचानक अतिथंड चटका बसल्याने एकदम हुडहुडी भरली . पण सावरून हळू हळू फ्री स्टाइल चे स्ट्रोक्स घेत सुरुवात केली .

हॅम्बर्ग सिटीच्या बरोबर मध्ये असलेल्या या तळ्यात 4 किलोमीटर ची फेरी मारताना ते शहर आणखी सुंदर दिसते (जे शहर तुम्ही आधी 4/5 दिवस पायी अन उघड्या बसच्या छतावरून कित्येक वेळा पाहिलेले असते )fishes eye view like we say birds eye view . तळ्यात काही ठिकाणी रस्ता चुकल्याने माझा स्वीमचे अंतरही थोडे जास्त करावे लागले . 2 तास 8 मिनिटात स्विम संपवून मी बाहेर आलो ( पुढील काळात पोहण्यामध्ये फार सुधारणा करणे गरजेचे आहे हे मनाशी ठरवले ) तळ्यातून बाहेर आल्यापासून तुमची सायकल घेई पर्यंत जे अंतर तुम्हाला पळत यावे लागते त्याला ट्रान्सिशन असे म्हणतात .हॅम्बर्ग चे ट्रान्सिशन 750 मीटर होते ( हे आयर्नमॅनच्या इतिहासातले सर्वात जास्तीचे ट्रान्सिशन डिस्टन्स असावे )आणि हा तसा वाया गेलेला वेळच असतो .भराभर सायकल चे बूट / हेल्मेट / गॉगल / अन खायचे जेल अंगावर चढवून त्याच ओलेत्या कपड्यांवर सायकलिंग ला निघालो यात एकूण 10 मिनिटांचा खुर्दा पडलाच .सायकलिंग चे प्रत्येकी 60 किलोमीटरचे 3 लूप्स / रिपीटस होते .त्या दिवशी दिवसभर पाऊस अन सोसाट्याचे वारे चालू होते . तापमान 12 डिग्री अन त्यात सारखी पावसाची रिपरिप ,वर भरीस भर म्हणून अंगावर एक पातळसा टी शर्ट अन एकदम तोकडी विजार होती .

त्या थंडीनं बराच गारठलो .शहरात खूप ठिकाणी शार्प U टर्न अन L टर्न होते . 120 किलोमीटर च्या अशाच एका U टर्न वर स्मिताचा ऍक्सीडेन्ट झाला अन तिचा हॅन्डल अडकून बसला . तिला तो वेळेत न रिपेअर करता आल्यामुळं तिला स्पर्धा मध्येच सोडावी लागली .दैवकृपेने तिला जास्त काही इजा झाली नाही .
माझी 180 किलोमीटर सायकलिंग 7 तासात संपली .परत तसच ट्रान्सिशन झोन मध्ये पळत पळत सायकल लावली बूट बदलून रनींग ला निघालो .रनींग चा रूट त्याच अल्स्टर तळ्याला उजवीकडे ठेऊन शहरातून होता .हे 42 किलोमीटर मात्र मी मस्त रमत गंमत रूट सपोर्ट एन्जॉय करत / स्वयंसेवकांसोबत संवाद साधत एन्जॉय केले .निरनिराळी वाद्य घेऊन पिपाण्या वाजवत तर काही ठिकाणी घरातली भांडी बडवत हे प्रेमळ हॅम्बर्गवासी आम्हा अतीव दमलेल्या देशोदेशीच्या स्पर्धकांना चीअर करत होते .माझ्या बेल्ट वरच माझं नाव वाचून ..." राउल यु आर डुईंग गुड ....राउल यू आर गोइंग टू बी आयर्नमॅन ..."असच बरंच काही मोटिवेश्नल ओरडत होते .तस पाहिलं तर या अनोळखी शहरातला त्यांचा आमचा काही क्षणांचाच ऋणानुबंध पण खिलाडूवृत्तीला भाषेच्या अन भौगोलिक सीमांच्या मर्यादा नसतात हेच खरे .
रनींगच्या सुरुवातीला मला स्मिताच्या ऍक्सीडेन्ट बद्दल कळले .तिथं जरासा मी पॅनिक झालो कारण माझ्यापेक्षा ट्रेनिंग मध्ये जास्त काटेकोर असलेली स्मिता स्पर्धेतून बाहेर पडली होती . त्या पॅनिक अवस्थेत मी रूट चुकलो अन 2 किलोमीटर नंतर दशरथ जाधव सरानी ती चूक लक्ष्यात आणून दिली त्यामुळं परत स्टार्ट पॉईंट ला जाऊन पाळायला सुरुवात केली . त्यामुळं माझी रनिंग एकूण 44 किलोमीटर ची झाली .शेवटी फिनिश लाइन ला पाहोचल्यावर ..."राहुल यु आर आयर्नमॅन नाऊ " हे शब्द ऐकल्यावर मागच्या 2 वर्षातल्या कष्टाचे चीज होते .त्यानंतर हातात तिरंगा घेऊन युरोपात "भारत माता कि जय "अशी आरोळी देऊन जो फिनिश लाइनला जो क्षण फोटोग्राफर टिपतो तीच तुमची खरी कमाई असते .

Dr. Rahul's Blog-7 [ "चिंब पावसातली लोहपुरुष स्पर्धा " ]

गेल्या रविवारी कसरसाई धरणाजवळ हि स्पर्धा आयोजित करण्यात अली होती . फुल्ल आयर्नमॅन डिस्टन्स प्रकारातली हि महाराष्ट्रातली पहिलीच ट्रायथलॉन स्पर्धा .आणि भारतातली दुसरी .
यावरून तुमच्या लक्ष्यात आलं असेल कि फुल्ल आयर्नमॅन डिस्टन्स प्रकारात अशी तिन्ही खेळ घेणं किती अवघड असेल . (4 किलोमीटर पोहणं +180 किमी सायकलिंग + 42 रुंनींग ) तर हे शिवधनुष्य पेलायची जबाबदारी घेतली होती आयर्नमॅन कोच Chaitanya Velhal आणि त्यांच्या पॉवरपिक्स या अकॅडेमीने .

सगळी तयारी झाली पण रेसच्या आधी 2 दिवस पाऊसच उघडत न्हवता . दुसरे कोणीही आयोजक असते तर स्पर्धा पुढं घेतली असती किंवा कॅन्सल केली असती . पण मागे हटतील ते पॉवरपिक्स चे कार्यकर्ते कसले . मुसळधार पावसाविरुद्ध त्यांनीही कंबर कसली अन धुव्वाधार पावसातही एकही वॉटर स्टेशन कमी पडू दिल नाही . उलट भर पावसातही आमच्या सोबत काही अंतर पळून आम्हास मोटिवेट केलं .
रात्री फुल्ल मॅरेथॉन पळणाऱ्या रनर बरोबर कोणी ना कोणी पॉवरपिक्स चा मेंबर अंधारात पळत होता . हि स्पर्धा मी थोडी इझी मोड मध्ये करत असल्याने पाऊस , वातावरण अन भन्नाट रूट सपोर्ट खूप एन्जॉय करता आला . कॉकी अन विनय सर या जेष्ठ्य स्पर्धकांनी ज्या तडफेने हि स्पर्धा पूर्ण केली त्यांनी खूप प्रेरणा मिळाली .
Thanks team PowerPeaks for fantabulous route support and cheer up 👍
महाराष्ट्रातल्या या पहिल्यावहिल्या फुल्ल आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलॉन स्पर्धेचा "फ्लॅग ऑफ "करण्याचा बहुमान मला अन स्मिता ला मिळाला , हि आमच्या आयुष्यातली फार मोठी शिदोरी आम्ही समजतो .

Dr. Rahul's Blog-8 ["Anything may happen in Ironman "]

परवाच कोणार्कला आयुष्यातली पहिली फुल्ल आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलॉन रेस (140.6मैल )रेस करण्याचा योग आला . हिला 140.6 का म्हणतात तर याच्यात 3.8 किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग , 180 किमी सायकलिंग आणि तात्काळ 42 किमी रनिंग असते .हे सगळं अंतर एकूण 140.6 मैल होत म्हणून त्याला 140.6 आयर्नमॅन म्हणतात . तर मागच्या वर्षी आम्हा ऍथलिट लोकांचं 'काळ 'वर्ष होत .एकही स्पोर्ट्स इव्हेंट झाला नाही त्यामुळं सगळेच कसे बाहेर येऊन रस्त्यावर कोणत्याही स्पर्धेत परफॉर्मन्स दाखवायला मुसमुसले होते . त्यामुळं कोणार्क ची रेस मी सोडणारच न्हवतो .तर थोडक्यात मी माझा रेस रिपोर्ट सादर करतो . आमचा स्विम पार्ट अशा ठिकाणी होता कि जिथं समुद्राला रामचंडी नदी मिळते ( bay area )हा पाण्याचा साठा नेहमी फार शांत असतो त्यामुळं ऑर्गनायझर ने स्पर्धा इथं घेण्याचा विचार केला असावा . तर आम्हाला 1750 मीटर चे 2 लूप करायचे होते ( 850 मीटर ला ⓤ टर्न होता ) तर बरोबर 7 वाजता आम्ही 23 फुल्ल डिस्टन्स चे स्पर्धकांनी अगदी शांत अशा घनदाट धुक्यात लपेटलेल्या पाण्यात सूर मारला .बरोबर 14 मिनिटांनी मी 850 मीटर च्या ⓤ टर्न ला गेलो .आणि परत फिरलो . इथं काहीतरी गडबड झाली .
त्यादिवशी पौर्णिमा होती आणि अचानक भरतीच्या अजस्त्र पाण्याचा लोंढा नदीमुखात शिरला .आणि आम्हा एकूण 40 ऍथलिट ना खोल पाण्यात घेऊन गेला .पण हे अशा बेमालूम पद्धतीने झाले कि आम्ही त्या ताकतवान प्रवाहात पोहत राहिलो . आम्हाला डायरेक्शन देण्यासाठी नदीत मध्ये 7-8 बोटी सरळ रेषेत नांगरून ठेवल्या होत्या .आणि त्यांच्या मध्ये टायर आणि दोर बांधले होते .पण झालं असा कि भरतीच्या अजस्त्र लोंढ्यामुळं या सगळ्या बोटी अन टायर / दोर त्यांची जागा सोडून नदीत खाली ढकलले गेले . आम्हाला गर्द धुक्यात जे काही थोडंफार दिसत होत त्यात आजुबाजूच्या बोटी होत्या त्यामुळं आम्ही बेसावधपने पोहत राहिलो .एक सव्वातास पोहल्यानंतर सुद्धा किनारा दिसेनासा झाला आणि हातपाय पण अतिथकव्यामुळं काम करेनासे झाल्यावर आम्ही त्या ओडिसी बोटवाल्याना विचारलं कि आपण कुठं आहोत ?
त्यांचाही बिचार्यांचा तोच प्रश्न होता 😁 तेंव्हा अजून रिस्क न घेता लवकर किनारा गाठावा असं सर्वानुमते ठरलं . हळूहळू तिरके जात आम्ही किनार्याच्या खडकांकडे गेलो आणि गुडघाभर पाण्यातून पळत पळत स्टार्ट पॉईंट कड गेलो . इथंच घोटाळा झाला कारण तिथला खडक अणकुचीदार टोक असलेला होता त्यामुळं सगळ्यांच्याच पायाला कापलं गेलं अन जखमा झाल्या . मलाही तिथं 4 ठिकाणी कापलं .
अशाप्रकारे आम्ही परत स्टार्ट पॉईंट ला आलो .तिथं ऑर्गनायझर नि हेच तुमचं फायनल स्विम गृहीत धरू असं सांगितल्यावर आम्ही सायकली काढल्या अन कोणार्क -पुरी या 45 किलोमीटर च्या रूट वर 4 लूप्स( एकूण 180 किमी ) सायकलिंग सुरु केलं .पहिले 90 किलोमीटर बरोबर 3 तासात पूर्ण करून 30 किलोमीटर प्रति तासाचे ऍव्हरेज ठेवले पण नंतर दुपारचे ऊन ( 39 डिग्री )अन दमटपणा ,उलटे वारे यामुळं पुढचे 90 किलोमीटर चा स्पीड ढेपाळला .एकूण 6 तास अन 54 मिनिटात 180 किलोमीटर सायकलिंग संपून रनिंग ला सुरुवात केली .
आता दुपारचे 4 वाजले होते .कोणार्कच्या चंद्रभागा बीच वर 7 किलोमीटर चे 6 लूप्स ( एकूण 42 किमी )पळायचे होते .जेवणाच्या ताटातलं कडू कारल आपण शेवटी ठेवतो तस मी हि फुल्ल मॅरेथॉन समजतो . दिवसा 39 डिग्री तापमान सोसल्यामुळं रस्त्या अजून 4 वाजताही वाफा सोडत होता .त्यामुळं दर किलोमीटरला मी टोपी काढून पाण्याने डोकं आणि टी शर्ट भिजवत होतो .पण याचा तोटा असा झाला कि उरलेलं पाणी निथळून बुटात जाऊन बसू लागलं आणि त्यामुळं पायाचे तळव्याची कातडी किरवजली ( पांढरी होऊन मऊ पडली ) .अजून एक चूक माझ्याकडून झाली होती .
रेस ला यायच्या 2 दिवस आधी मला एक बूट आवडला होता .बघताक्षणी त्याच्या प्रेमात पडलो अन हा घालून पळायचं ठरलं . खरं तर नवीन बुटाचे 3/4 रन झाल्यावर तो चावत नाही नाहीतर पहिल्या लॉन्ग रन ला खूप त्रास देतो . माझी तर हि फुल्ल मॅरेथॉन होती अन तळवे आधीच किरवजले होते त्यामुळं पहिल्या 12/15 किलोमीटर मध्ये बोटांना 7/8 फोड आले .स्विम च्या वेळी खडकावरून पळत येताना झालेल्या जखमांमध्ये थोडी वाळू गेल्यामुळं त्यापण चुरचुर करत होत्या पण सगळ्यात जास्त फोड त्रास देत होते . 14 किलोमीटर नंतर जर स्पीड वाढवावा म्हणलं तर पंजाच्या वेदना रडवत होत्या .
मग एक ठिकाणी थांबून स्वतःला थोड्या स्वयंसूचना दिल्या कि ......"हे असच आहे अन हे असच असणार आहे ". याचा फार फायदा झाला कारण त्यानंतर विशेष दुखलं नाही .( शेवटी दुखणं हे मानसिक असत आणि एकदा तुम्ही ते मान्य केलंत कि त्याचा त्रास होत नाही )pain is fuel in these races . रनिंग ला रूट सपोर्ट चांगला होता . Aid स्टेशनवरची पोर आमचे कष्ट पाहून पळत पळत पळत येऊन आम्हाला जबरदस्ती सैंधव मीठ लावलेले संत्रे / कलिंगडाच्या फोडी / सोललेल्या केळी / सरबताचे पाणी / कोक आणून देत होती .
त्या कठीण वेळी त्यांची फार मदत झाली .आम्हाला एकमेकांची भाषा नीट कळत न्हवती पण हे ऍथलिट सकाळी 7 पासून रस्त्यावर गेले 12 तास जीव काढत आहेत म्हणजे कायतरी चांगलं करत असावेत म्हणून ते जबरदस्ती कायतरी खा म्हणून माग लागत होते .असं करत माझे न थांबता 35 किलोमीटर झाले होते .माझ्या जुनाट ट्रक ची एनर्जी आता रिसर्व ला लागली होती . त्यामुळं हे अंतर चालत पळत करायचे असे ठरवून मी निघालो आणि तिथ मला अँडी भेटला . अँडी बद्दल थोडक्यात सांगतो .22 वर्षाचा चा चंदिगढ चा पोऱ्या माझ्या पॉवरपिक्स ट्रेनिंग अकॅडमीत ऑनलाइन ट्रेनिंग घेतो . आम्ही दोघे क्वचितच भेटलो असेल . हा त्यादिवशी स्वतःची हाफ आयर्नमॅन पूर्ण करून आम्हाला चीअर अप करायला आला होता . त्यांनी मला शेवटचे 7 किलोमीटर पळायला मदत करू का विचारलं . म्हणलं नेकी और पूछ पूछ . पण तो म्हणाला आपको पुरा 7 किलोमीटर दौडणा पडेगा . आता अली का पंचाईत . आपल्या पायात तर त्राणच न्हवत . म्हणलं सुरुवात तर करू . जुनिअर पोरगा आहे . गोड बोलून चालू .
पण पठ्याने पहिल्या किलोमीटर पासून मला सलग पळवले . मी वॉटर स्टेशन ला पाणी किंवा केळ घ्यायचे निम्मित करून थांबायला पाहायचो तर हा गडी आधीच जाऊन केळं सोलून आणून द्यायचा . शेवटचे 2 किलोमीटर जेंव्हा फार मी पाय फरफटत पळत होतो तेंव्हा अँडी ने सांगितलं कि आपण दोघे जीव खाऊन ओरडू या .आणि खरंच दुखण्याकडे दुर्लक्ष्य होऊन माझा स्पीड चिंगाट वाढला .त्या रात्री कोणार्क - पुरीच्या अंधाऱ्या रोडवर ज्यांनी एका मराठी अन एका पंजाबी वेड्याला ओरडत पळताना पाहिलं असेल ते हादरले असतील .
फिनिश लाइन 500 मीटर दिसत असताना माझा आयडॉल ट्रायथलिट ओंकार मागून पळत आला . त्याला मी म्हणल कि तुम्ही आधी फिनिश करा मग मी येतो . पण त्यांनी सांगितलं कि आपण एकत्र फिनिश करू .आणि माझ्या पहिल्या वहिल्या फुल्ल आयर्न मॅन चा ड्रीम फिनिश झाला (14.40)😊

Dr. Rahul's Blog-9 [बॅचमेटच्या चित्रांचं प्रदर्शन]

बालगंधर्वच्या आर्ट गॅलरी मध्ये चित्र बघायला या आधी बऱ्याच वेळा गेलोय पण आज ऊर विशेष अभिमानाने फुलला होता कारण माझ्या mbbs च्या बॅचमेटच्या चित्रांचं तिथं प्रदर्शन होत . डॉक्टर नितीन नागरे याने mbbs नंतर ऑर्थोपेडिक केलं . 10 वर्ष सुखैनैव प्रॅक्टिस केल्यावर पठ्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक ?एकदम वयाच्या चाळिशीनंतर याने कलासागर कला महाविद्यालयात प्रवेश घेतला .तेही छोट्यामोठ्या नाही तर चक्क 5 वर्षाच्या डिग्री कोर्स ला . दिवसभर ऑर्थोपेडिक चा कुटुंबकबिला सांभाळून हा हाडवैद्य रात्रभर कॅनव्हास वर रंग जोडत बसतो .
आज नितीनने हाताला धरून अख्खी गॅलरी दाखवली . बेसिक रेषा , फौंडेशन , 2 D आर्ट , कॉम्पोसिशन , स्टील फोटोग्राफी , प्रकाशचित्रे , ऍबस्ट्रॅक्ट .... असं खूप काही नितीन मला सांगत होता . मला माठ्याला खूप कळालं आणि खूप काही डोक्यावरून गेलं पण तिथं फिरताना एक लय भारी वाटत होत कि आपला दोस्त "आर्टिस्ट "झाला .आणि त्यांनी माझं काढलेलं एक तैलचित्र पण प्रदर्शनीत लावलं होत त्यानं अजून मूठभर मांस अंगावर चढलं होत .
पु ल देशपांडे म्हणायचे तुमचा उपजीविकेचा मार्गाव्यतिरिक्त तुम्ही जोपर्यंत काव्य , शास्त्र , विनोद , कला यापैकी एकाची कास धरत नाही तोपर्यंत तुमच्या जगण्याला जीवन जगणे असे म्हणता येणार नाही . आपणा सगळ्यांच्या आयुष्यात असाच जिवंतपणा लवकरात लवकर येवो हि सदिच्छा

Dr. Rahul's Blog-10 [हसरे दुःख ]

पुस्तकाचे नाव : हसरे दुःख
लेखक : भा .द .खेर
समीक्षा : डॉ. राहुल झांजुर्णे , हडपसर
माझ्या "दैवताच दैवत " म्हणजे महान हास्यकलाकार चार्ली चॅप्लिन यांचा चरित्र अभ्यासायचे खूप दिवसाचं राहून गेलं होत .तर या लॉक डाऊनचे आभार .( पूल देशपांडे चार्लीला दैवत मानायचे .)
नाझी कर्दनकाळ हुकूमशाह हिटलर चा अन चार्लीचा जन्म एकाच आठवड्यातला आहे हे समजल्यावर माझा तर नक्षत्र अन भविष्यावरचा विश्वासच उडाला .हिटलर ने लाखो माणसं युद्धाच्या खाईत लोटून भिकेला लावली अन त्याच सुमारास जन्मलेल्या चार्लीने तीच माणसं हसवत ठेवून परत माणसात आणली . चार्लीचा जन्म लंडनमध्ये हॅना नावाच्या एका साध्या अन गरीब नटीच्या घरी झाला . वडीलही नाटक कलाकार पण दारूच्या फार आहारी गेल्यामुळं घटस्फोट झाला अन चार्ली अन त्याचा भाऊ लहानपणापासूनच आईसोबत राहत होते .
उत्पन्नाचं साधन नाही त्यामुळं आई चर्चचे कपडे घरी शिवून परिस्थितीला ठिगळ लावत होती पण त्यातून साधं घरभाडे पण निघेना अन उपासमार सहन होईना म्हणून मग हॅना सरकारी वर्क हाऊस मध्ये राहून काम करू लागली अन दोन्ही मुलं सरकारने अनाथाश्रमात टाकली .चार्लीची परिस्थिती अवधी हलाखीची होती कि तो रस्त्यावर शिजवलेले बटाटे विकणाऱ्या फेरीवाल्याकडे दिवसभर बघत बसायचा पण त्याच्याकडे 2 शिलिंग पण नसायचे . बरेच दिवस ते थोरल्या भावाचा सिडनीचा लोकरीचा सूट थंडीत भाड्याने देऊन आठवड्याचे 7 शिलिंग मिळवायचे .छोट्या चार्लीने शाळा सोडून फुले विकली ,मेणबत्त्यांच्या दुकानात सांगकाम्याचं काम केलं ,एका हॉस्पिटल मधे पेशंट लोकांना काही दिवस बेडपॅन दिले पण चार्लीची उंची कमी त्याला खिडक्या पुसता येत नाहीत म्हणून त्याच्या मालकाने त्याला काढून टाकले .एक दिवस चार्लीच्या आईने खूप भूक लागली म्हणून त्याला चहा मागितला पण घरात काहीच न्हवत ....त्याच दिवशी त्याच्या आईला वेडाचा पहिला झटका आला ( चार्लीच्या बालमनावर याचा फार परिणाम झाला ) आईला वेड्याच्या इस्पितळात भरती केलं गेलं त्यामुळं सरकारने या दोन्ही मुलांची कस्टडी वडिलांकडे दिली जिथं चार्लीचा सावत्र आईनं अतोनात छळ केला . पण या सगळ्या दुःख , दरिद्रता , हालअपेस्टा याच्या भट्टीतून एक प्रगल्भ कलाकार जन्माला येत होता अन त्याच्या विनोदाला करुणेची झालर होती .
चार्लीला सुरुवातीला शेरलोक्स होम्स च्या नाट्य प्रयोगांमध्ये काम करण्याची संधी मिळाली . त्यांनतर फ्रेड कार्नो या निर्मात्याने लंडनमध्ये आठवड्याला 4 पौंड या पगारावर त्याला कलाकार म्हणून संधी दिली . अर्धवट शिक्षण झाल्यामुळं चार्लीला नीट वाचता यायचं नाही त्यामुळं त्याच्याकडून स्क्रिप्ट पाठ करून घेतलं जायचं.
चार्लीच काम बघून कॉर्नो कंपनीनं त्याला अमेरिकेत जायची संधी दिली अन चार्ली समोर जागतिक रंगमंचाची कवाड खुली झाली . तुम्हाला तो " वेंधळा ट्रॅम्प "आठवतोय का ? मोठी ढगाळी पॅन्ट ,टाइट चुरगळेला कोट , डोक्यापेक्षा मोठी डर्बी हॅट , काठी , हिटलर छाप मिशी ,पायांपेक्षा मोठे बूट , फेगडी चाल .....हे वेशभूषा चार्लीला एकदा सहज मेकअप रूम मध्ये सुचली अन त्याने ती जवळपास सगळ्या चित्रपटात वापरली . त्यामुळं ट्रॅम्प सारखा वेन्धळा , गडबड्या , धडपड्या , बेंगरूळ अशी चार्लीची इमेज झाली पण पडद्यामागचा चार्ली हा एक देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व होत .
चार्लीला संसारसुख फार उशिरा मिळालं . पहिली तीन लग्न होऊन घटस्फोट झाल्यावर त्यानं वयाच्या पन्नाशीत उना ओनील या अठरा वर्षाच्या अभिनेत्रीशी लग्न केल अन तिच्यापासून चार्लीला 8 मुलं झाली अन उनाने चार्लीला मरेपर्यंत साथ दिली .( विशेष म्हणजे चार्लीच्या आधीच्या तिन्ही बायका सोळा अठरा वर्षाच्याच होत्या ) चार्ली चॅप्लिन हा मूकपटांचा बादशाह होता .
ध्वनिमुद्रणाची सोय नसल्याने कलाकारांना जे काही पडद्यावर दाखवायचं ते फक्त चेहऱ्याचे हावभाव अन देहबोलीतूनच दाखवता यायचं .चार्लीचे द कीड , डॉग्स लाइफ , गोल्ड रश हे अजरामर चित्रपट पाहण्यासाखे आहेत .त्यानंतर युग आलं बोलपटांचं ...चार्लीला सगळ्यांनी घाबरवलं कि आता तुझे मूकपटाची रीळ कचऱ्यात जातील .पण ऐकेल तो चार्ली कसला . त्याच म्हणत होत कि बोलपटाला भाषेचं बंधन आहे त्यामुळं हे चित्रपट फक्त काही देशातच चालतील पण मूकपट जगभरातील प्रेक्षक पाहतील . आणि चार्लीच म्हणणं खरं ठरलं . बोलपट सुरु होऊनही चार्लीने " सिटी लाइट्स " हा मूकपट काढला अन जगभरातल्या प्रेक्षकांनी चक्क तो उचलून डोक्यावर घेतला . या चित्रपटाच्या प्रीमियर शो ला चक्क शास्त्रज्ञ आइन्स्टाइन चार्लीबरोबर बसला होता .
यानंतर चार्लीने पहिला बोलपट केला " ग्रेट डिक्टेटर " हिटलरच्या हुकूमशाहीच्या विरोधात हा एक उपहासात्मक चित्रपट होता . चार्लीने याच सुमारास दुसऱ्या महायुद्धातील रशियन युद्धग्रस्तांना निधी जमवण्यासाठी कार्यक्रम केले . या नंतर चार्लीचा पडता काळ सुरु झाला . जन्माने ब्रिटिश असूनही त्याने ज्या अमेरिकेला कर्मभूमी मानून पूर्ण आयुष्य अमेरिकेत घालवल होत त्याच अमेरिकेत त्याला कम्युनिस्ट मानून निदर्शन होऊ लागली .स्वाभिमानी चार्लीनेही मग अमेरिका सोडली अन लंडन जवळ केलं .
चार्लीने शेकडो चित्रपट केले जे इथून पुढं शेकडो वर्ष कधीहि , कोणत्याही कालखंडात , कोणत्याही भाषिक अन कोणत्याही बौद्धिक गटातील लोकांनी पहिले तरी ते त्यांना पोट धरून हसवतील .हे चार्लीचे समस्त मानवजातीवरचे उपकार आहेत . चार्लीला जेंव्हा ऑस्कर मिळाला तेंव्हा सर्व मान्यवर प्रेक्षकांनी तब्बल बारा मिनिट टाळ्या वाजवून अन जागेवर उभं राहून मानवंदना दिली अन चार्लीलाही रडवल .
त्याला अजून 2 विषयावर चित्रपट काढायचे होते पण राहील .ते विषय होते येशू अन नेपोलियन बोनापार्टे प्रतिकूल परिस्थितीतही त्याच्या आईचा येशूवर अतूट विश्वास होता म्हणून येशू वर अन त्याचे त्याला कधीच न लाभलेले त्याचे वडील नेपोलियन च काम पडद्यावर करायचे म्हणून नेपोलियन वर चित्रपट काढायचा होता .
तर असा हा चार्ली त्याच्या राहत्या घरी स्वित्झर्लंड मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी 1977 ला स्वित्झर्लंड ला सगळं जग जेंव्हा नाताळाच्या दिवशी हसतखेळत होत तेंव्हा देवाघरी गेला .
मला भावलेली चार्लीची काही वाक्य :
" माझ दुःख कोणाच्या हसण्याचं कारण होऊ शकत पण माझं हसणं कधीच कोणाच्या दुःखाचं कारण होणार नाही "
" आरसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे कारण मी रडताना तो कधीच हसत नाही "
" ज्या दिवशी मी हसत खिदळत नाही तो माझा दिवस वाया गेलेला असतो "
( मोठ्या ब्लॉग बद्दल क्षमस्व 🙏🏻)
डॉक्टर राहुल झांजुर्णे
हडपसर
Dr. Rahul's Blog-11 [मंदिरांचा पूर्वेतिहास आणि भित्तिचित्रे ]

मंदिरांचा पूर्वेतिहास आणि भित्तिचित्रे
तर मित्रानो माझ्या मनातला पहिला प्रश्न कि एवढ्या लांब एवढी प्रगल्भ हिंदू संस्कृती 6000 किलोमीटर लांब कशी आली अन आता पूर्णपणे गायब कशी झाली ? तर इंडो-चीन च्या या भागात सहाव्या शतकात व्यापार्यांबरोबर राजा श्रुतवर्मन गेला अन तिथल्या मूळ फुनान राजाला हुसकावून त्याने कंबोज राज्य वसवलं .इथून पुढं 15 व्या शतकापर्यंत 27 राजे होऊन गेले . हें मुख्यतः हिंदू राजे होते ह्या सगळ्या खमेर वंशीय राजांनी कंबोज नगरीची भरभराट केली .
जमीन आणि पाण्यातून चालणाऱ्या व्यापारामुळे हे खमेर राजवंश हिंदुस्तानाशी सांस्कृतिक अन अध्यात्मिक संपर्कात होते . नवव्या शतकापर्यन्त त्यांच्याकडं आर्थिक अन भौतिक सुबत्ता आली होती त्यानंतर त्यांनाही अमरत्वाचे ( अमृताचे )वेड लागलं ज्याप्रमाणे इजिप्त मध्ये पिरॅमिड्स बांधले गेले त्याच प्रमाणे इथं हजारो मंदिर बांधली गेली .प्रत्येक राजाने त्याच्या पूर्ण हयातीत पूर्ण जनतेला कामाला लावून प्रचंड मंदिरनिर्माण केले .मी एकूण 52 मंदिर पहिली , प्रत्येक मंदिरामध्ये मुख्य थीम हि अमृतासाठी समुद्रमंथन आहे .त्याकाळापासून ते मागच्या महिन्यात बांधलेल्या पुलाचे एकच वैशिष्ट्य ते म्हणजे पुलाचे दोन्ही कठडे म्हणजे वासुकी नाग अन एक बाजूला 50 देवानी वासुकीला घुसळत आहेत अन दुसऱ्या बाजूला 50 दानव आणि मंदिर म्हणजे मेरू पर्वत .सरकारी ऑफिसच्या जिन्याच्या रेलींगलाही वासुकीच डिझाइन .या लोकांच्या डोक्यात अमृत एवढं पक्कं घुसलं आहे .
ब्रह्मा निर्मिती करतो , विष्णू रक्षण करतो अन महादेव तांडव करतो हि मुख्य संकल्पना त्यामुळं सगळी मंदिर एकतर शंकर नाहीतर विष्णूची . 12 व्या शतकापर्यंत हे खमेर राजे हिंदू होते अचानक त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला .पण नंतर सत्तेवर आलेल्या महायान बौद्ध ( सध्या थेरवडा बौद्ध आहेत )लोकांनी एकही मंदिर किंवा मूर्ती फोडली नाही . फक्त मुख्य मूर्ती आदराने बाजूला काढून ठेवली आणि तिथं बुद्ध मूर्ती स्थापित केली . ( जस सध्याच्या आंग्कोर वाट मंदिरातील मुख्य विष्णुमूर्ती बाहेर प्रवेशद्वारावर व्हरांड्यात आहे ) त्यामुळं हे सगळं वैभव 1000 वर्ष जस आहे तस टिकलंय ( सलाम त्यांच्या सहिष्णू वृत्तीला 🙏🏻)
त्यानंतर आलेल्या दुष्काळात सोळाव्या शतकात कंबोडिया ओस पडले . आणि या मधल्या 250 वर्षात हजारो मंदिरांच्या कडेने भयंकर जंगल वाढले . 1860 मध्ये एका फ्रेंचाला हे मंदिर सापडले .आतापर्यंत 3000 मंदिरे सापडली आहेत .अजूनही मंदिरे सापडत आहेत आणि सगळीच भव्यदिव्य आहेत . एकूण 3 प्रकारच्या दगडांनी हि मंदिरे बांधलीत .दगडी विटा , स्थानिक जांभ्या ( जीवाष्म )दगड , आणि मूर्तिकामास योग्य असा वालुकाष्म दगड .
पण हा वालुकाष्म दगड इथं कुठंच उपलब्ध नाही .तर या खमेर राजांनी 65 किलोमीटर दूर कुलेन पर्वतावर खाणी खोदल्या आणि तिथून भलेचौडे कॅनाल आंग्कोर वाट पर्यंत आणून मंदिराच्या कडेने आणि पूर्ण राज्यात कालव्याचे जाळे तयार केले .दहाव्या शतकात त्या काळाची सगळ्यात प्रगत जलप्रणाली कंबोडियात या मंदिरांच्या कृपेने झाली आणि तिथंच कृषी क्ष्येत्रात कंबोडिया संपन्न झाले . सहस्त्र शिवलिंग या कुलेन पर्वतावरील खाणी आणि नदीच्या उगमातील 1000 शिवलिंगे सुद्धा मी बघून आलो .
या कालव्यातून 10 टनापर्यंत दगड तराफ्यातून सहजी मंदिरापर्यंत आणले गेले .माझा उत्साह बघून गाईड ने मला जुन्या पद्धतिच्या मंदिरनिर्माण कार्यशाळेत नेले तिथं दोरी अन लाकडी पुली वापरून फक्त 2 बोटानी 200 किलोचा दगड मला उचलायला दिला आणि आम्ही 2 अजस्त्र दगड एकमेकाला घासून त्याला पोलिश सुद्धा केले .हि सगळी अवाढव्य मंदिरे कोणत्याही सिमेंट शिवाय फक्त एकमेकात दगड गुंतवून कशी उभी आहेत .
key स्टोन म्हणजे काय जो काढला कि अक्खी भिंत पडू शकते हे सुद्धा गाईड ने दाखवले .
कंबोडियातली भित्तिचित्रे नुसत्या आंग्कोर वाट मंदिरातली एका मजल्यावरची भित्तिचित्रांची एक गॅलरी सलग सव्वा किलोमीटर लांब आहे .जगातला सगळ्यात लांब कॅनवास म्हणा कि . मूर्ति बनवन तस सोप्प कारण तुम्ही त्रिमितीय (3D )काम करताना कितीहि खोली मिळते . भित्तिचित्रे अवघड कारण द्विमितीय 2 D काम करताना फक्त 2 इंच खोदकाम करून त्रिमितीय 3D इफेक्ट द्याचा असतो .या सलग भित्तिचित्रांमध्ये पूर्ण रामायण आहे , महाभारत आहे , खमेरांची युद्धे आहेत , महत्वाचं मला पाहिजे असलेलं हजार वर्षांपूर्वीच खमेर दैनंदिन जीवन आहे . ज्यात खमेर नागरिक करमणुकीसाठी कोंबडे , डुक्करे झुंजवत तें दिसतंय , त्याकाळी मांस भाजायला "बार्बेक्यू "असायचा , भात खाऊन झाल्यावर लोक हात धुवायला "फिंगर बाउल " वापरत हेही स्पस्ट दिसतंय . हजारो अप्सरा देवता शिल्पित केल्यात .मी गाईड ला विचारलं एक हजार पावसाळे सहन केल्यानं बऱ्याच अप्सरा मूर्ती थोड्याशा झिजल्यात .मला अगदी कोऱ्या करकरीत अप्सरा दाखव कि .... मग काय गड्यानी काढली कि माझी वरात .झाडाझुडपातून , सरपटत , एकदम आडबाजूला गुहांमध्ये काही अप्सरा मुर्त्या होत्या जिथं वादळ , पाऊस यांचा किमान फटका बसला होता . काय आरस्पानी सौंदर्य होत त्यांचं असं वाटत होत आत्ता बाहेर येतील आणि नृत्य पेश करतील .
मी बायकोचा DSLR कॅमेरा नेला होता उधार . तिला काय माहित बिचारीला मी त्यात शेकडो लावण्यवती अप्सरा पकडून आणल्यात 🤗.
प्रत्येकीची केशभूषा वेगळी न प्रत्येकीचे कंबरवस्त्र ( सोरॉन्ग ) वरच डिसाइन वेगळं . हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे . माझा दिवस जसा रोज पहाटे आंग्कोर वाट मध्ये सूर्योदय टिपून व्हायचा तसा संद्याकाळी बाहेर हाकलताना सूर्यास्त टिपायचो . मला आंग्कोर वाटावर इंद्रधनुष्याची मिळालं .
मला फक्त ती विष्णूमूर्ती केविलवाणी वाटली .जो विष्णू एकेकाळी पूर्ण कंबोडियाच्या एकमेव अनभिषिक्त सम्राट होता ज्याच्यासाठी त्याकाळच्या लाखो प्रजननांनी त्यांची पूर्ण ह्यात खर्च करून हे जगातलं सगळ्यात मोठं मंदिर बांधून त्याला मेरुपर्वताच्या टोकावर विधिवत बसवलं होत तोच चतुर्भुज विष्णू काळाच्या एका फटक्यात एकदम व्हरांड्यात येऊन फक्त एका नेसत्या पीतवस्त्रांनिशी उभा आहे . ना दिवा ना पूजा ना पणती .
मी रोज या मूर्तीसमोर मेडिटेशन करायला बसायचो .
मुळात कंबोडियात भारतीय औषधालाही सापडत नाही . त्यामुळं जागापण एकदम रिकामी . तसा मी फार चंचल असल्याने मला ध्यानात जायला 15/20 लागतात पण काहीतरी होत त्या मूर्तीत . तिथं ध्यान लावून बसलो कि लगेच माझी ब्रम्हानंदी टाळी लागायची पण या विष्णू मूर्तींन मला शिकवलं .....राहुल या जगात काहीच शाश्वत नाही .😌
कंबोडिया डायरी
क्रमश :
डॉक्टर राहुल झांजुर्णे
Dr. Rahul's Blog-12 [सायकल वरून अष्टविनायक यात्रा ]

नमस्कार मित्रानो
सांगायला आनंद होतोय कि आज माझी सलग तिसऱ्या वर्षी सायकल वरून अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली .
डेक्कन क्लीफ हँगर 6 चे वेध महिन्यापासून लागलेत . आणि त्याची तयारी करायचा फार कंटाळा आला होता .
कारण मागचं अक्खा वर्ष मी रॅनिंग शिकायच्या असफल प्रयत्नात घालवलं . माझं नव्वदीतलं वजन बघून एका हितचिंतकाने मला मागच्या वर्षी सल्ला दिला होता कि तुझं रनिंग ने वजन कमी होईल तर "वत्सा जा पळ "
पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही दुडक्या चालीने पळालो पण थोडे .पण दोन्ही वर्षी सलग सातारा हिल मॅरेथॉन ग्रुप मध्ये शेवटच्या नंबराने ( साडेतीन तास ) पोहोचल्याने उरलेसरले अवसान गळाले . माझा टाइम पाहून नवख्या रनरलाही हुरूप आला 🤗.
तरीही वजनाचा काटा काही नव्वदी सोडेना . तेंव्हा मी माझा सोयीचा असा समज करून घेतला कि काही शरीरं कदाचित रनींग साठी बनलेली नसतातच मुळी तर ...... ती सायकलिंग साठी बनलेली असतात .🙈
आणि मग परत आपल्या लांब पल्ल्याच्या सायकलिंग ची सुरुवात करावी असा विचार केला . आणि कोणत्याही मोठ्या गोष्टीचा श्रीगणेशा म्हणजे बाप्पा आलेच ......आणि अष्टविनायक तर माझी सगळ्यात आवडीची राइड .
सायकल वरून अष्टविनायक आवडीची काही कारणे :
हे आठही गणपती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसले आहेत . जस कि सिद्धटेक ला तुम्ही नदी ओलांडून अहमद नगर जिल्ह्यात जाता तर पाली महड च्या दर्शनाला तुम्ही कोकणात उतरता . लेण्याद्री साठी तुम्ही नाशिकच्या वेशीअलीकडे डोंगरात 350 पायऱ्या चढून जाता .आणि हवामान म्हणाल तर सिद्धटेक राइड पूर्ण चिखलात लोळून केली तर रांजणगाव ला धो धो पावसात गेलो .कोकणात जीवघेणा उकाडा होता तर आज नाशिक रोडला ओझर करताना कडाक्याचं ऊन होत .सगळी मज्जाच मज्जा .
सार्वजनिक बांधकाम खात्याची कृपा तर रस्त्यावरून अवधी ओसंडून चाललीये कि मी या अनुभवावरून जगातील कोणत्याही खराब रोडवरून माझी रोडबाइक दामटू शकतो . या फिरंतीमधला माझा सगळ्यात आवडीचा पार्ट असेल तर निरनिराळ्या ठिकाणच्या हरतऱ्हेच्या लोकांना भेटता येत . हि अनुभवाची शिदोरी नक्कीच आयुष्यभर कामी येईल . लेखन मर्यादेमूळ आजचा ओझर मधला एक अनुभव सांगून संपवतो .
आज ओझर गावात सायंकालवरून गेल्यावर मंदिराकडे न जाता रस्ता चुकलो आणि एक गल्लीत गेलो तिथं गावातले लहान पोट्टे सायकल सायकल खेळत होते . मला बघून एक पिल्लू केकाटल " त्यो बघ वाकड्या हँडलवाला सायकलवाला " .लगेच पिलावळ सायकलच्या कडेनी जमली . मी पत्ता विचारल्यावर त्यातला एक म्होरक्या म्हणाला देवळापावतो रेस लावतो का .
म्हणलं चला .पोरांना पुढं जाण्यासाठी मी आपला हळू हळू सायकल चालवत होतो . देवळापाशी पोचलो तर बघतो काय एक छोटुकलं मधल्या बोळातन बारकी प्लास्टिक ची सायकल हातात उचलून आमच्या आधी फिनिश लाइन वर हजर . मी म्हणल अरे चीटिंग आहे .तर म्हणतोय कसा ' आमचा एरिया आहे ,आमचा रूल चालणार ' पोट धरून मनमुराद हसलो .
तिथंच फतकल घालून आम्ही पेढे खाल्ले ( मी हरल्याचे )पोरांना विनंती केल्यावर त्यांच्याबरोबर एक फोटो पण काढला ( सोबत जोडत आहे )
धन्यवाद
Date: 23 Sept 2018.

Get In Touch

Kanchan Junga Apartment, Near Bank of Maharashtra, Pune-Solapur Rd, Hadapsar Gaon, Hadapsar, Pune, Maharashtra 411028

zplusaccidenthospital@gmail.com

Mobile: 88055 78176 | 020 - 2687 9400

Follow Us

© ZPLUS Accident Hospital. All Rights Reserved @ 2023.

Designed by XCOM DESIGN STUDIO